सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.
शुद्धतेनुसार असतात कॅरेट
24 कॅरेट- 99.9
23 कॅरेट–95.8
22 कॅरेट–91.6
21 कॅरेट–87.5
18 कॅरेट–75.0
17 कॅरेट–70.8
14 कॅरेट–58.5
9 कॅरेट–37.5
कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा.
(22/24)x100 = 91.66 म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 25 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (25000/24)x22= 22916 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.

केडीएम मार्क सोने शुद्ध असल्याचे सांगूनही विकले जाते. केडीएम मार्क म्हणजे आपण जे दागिने विकत घेत आहोत त्यात केडियम मिक्स आहे. सोन्यात तांब्याचीही भेसळ केली जाते. त्यामुळे दागिने किंवा सोन्याची कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी नंबर किंवा मार्क जरुर तपासून घ्या.
हॉलमार्क शुद्धतेची गॅरेंटी आहे. हॉलमार्कचे निर्धारण भारताची एकमेव एजेंसी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआईएस) करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी ही संस्था त्यांची तपासणी करते. त्यानुसार त्यावर हॉलमार्क दिला जातो. पण काही ज्वेलर्स दागिन्यांची तपासणी करण्यापूर्वीच हॉलमार्क लावतात. अशा वेळी हॉलमार्क साईन खरे आहे का, हे बघणे अतिशय आवश्यक आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी साईन असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही लिहिली असते. त्यात ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकतेचा लोगो असतो.
कोणत्याही दुकानातून सोने विकत घेताना पक्के बिल तयार करुन घ्या. त्यात किती कॅरेटचे सोने आहे, बाजारभाव कोणता घेतला आहे, मजुरी किती लावली आहे याची तपासणी करा.