अगदी प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.
शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत.
तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते.
पहिले शक्तीपीठ- श्रीमहालक्ष्मी माता (कोल्हापूर)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो.
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही.
हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात.
देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत.
त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्या काळ्या दगडात केलेली आहे.देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्यावर उभी करण्यात आलेली आहे.
कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.
विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात.
ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात.
हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.
एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्रीमहालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला.
कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्रीमहालक्ष्मीने मान्य केले.
दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय.
श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.
देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले .
शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले .
जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती .
राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली .
ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला .
आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला .
घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली .
पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले .
रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला .
तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘ इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर ‘ असे सांगितले .
परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .
या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली .
तो दु : खी होऊन शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .
फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले .
त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले .
या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते .
परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘ मातापूर ‘ म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ ऊर ‘ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!
तिसरे पीठ- श्री तुळजाभवानी माता (श्रीक्षेत्र तुळजापूर)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्रा…ची कुलस्वामीनी आहे.
हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे.
इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

एका कथेनुसार,
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.
परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला;
परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली.
आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.
त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.
यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली.
तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला.
तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले.
कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
उस्मानाबाद – तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.
वणीचे अर्ध शक्तीपीठ- ‘सप्तशृंगीदेवी’ (सप्तश्रृंगगड,वणी)
श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत.
या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय.
सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो.
साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली.
उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.
सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.
सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव,
कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात.
या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती.
निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते.
अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे.नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे.
महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात.

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे.
कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.
सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते.
शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले.
सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नावसप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते.
सुमारे पाचशे पायर्या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे.
देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे.
मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली.
तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी.
महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते.
नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.
देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते.
एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला.
त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख,
अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला,
ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.
मूर्ती काहीशी झुकलेली आहे.
त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत होते.
त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.