विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे.शहरात या विकृतीने थैमान मांडले आहे.
रोज टीव्ही सिरियल्स आणि वाट चुकलेल्या मित्र मैत्रिणींचे अनुकरण करत आपण आपला आत्मा आणि
मने गहाण ठेऊन जे पाऊल उचलत असतो ते कितपत योग्य हे एकदा स्वतःच्या मनाला विचारायला हवे.
ज्या पतीशी आपण सात जन्म एकत्र राहायची वचने अग्नीच्या साक्षीने देतो,
गळ्यात पतीच्या नावाचे मंगळसूत्र आजन्म घालतो,भाळात सौभाग्याचे लेणे म्हणून कुंकू लावतो या साऱ्या प्रथा मूर्खपणा असतो का ?
खुशाल हल्ली स्त्री व पुरुष दोघेही आपल्या पती/पत्नी व्यतिरिक्त एखादे असावे ही भावना मनात ठेवतात.
प्रेम हे गोंडस नाव देऊन आपण या विकृती लपवत असतो.

लग्नापूर्वी कित्येकांनी प्रेम या शब्दाचा अर्थ न समजता ज्या सेक्स च्या मैफिली रंगवल्या असतात त्या सुद्धा प्रेमाचा घेतलेला अतिशय घाणेरडा अर्थ होय.
पण लग्नापूर्वी झालेले जे काही असेल ते लग्नाच्या अग्नीत जाळून खाक केले पाहिजे.
पतीच्या आयुष्यात मधुचंद्राची रात्र ही त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र असते,
लग्नापूर्वी केलेल्या चुकांमुळे आपण आपल्या पतीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते व
पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते हे एकदा मनाला विचारणे गरजेचे आहे.
नाते टिकवायचे असेल तर जे आहे ते स्वीकारणे याशिवाय पर्याय नसतो,पण प्रत्येकाचे मन इतके मोठे असेलच असे नसते.
एखादा पुरुष जगातील सर्वात मोठी दुःखे सहन करू शकतो पण आपल्या पत्नीची गद्दारी कदापि नाही.
हल्ली मात्र पतीसमोर राजरोजपणे मित्रांशी होणारे चॅटिंग ही कुठली संस्कृती म्हणावी..?
जे स्त्रियांबाबत तेच पुरुषांच्या बाबत.
एका मैत्रिणीने असाच एक मेसेज केला म्हणून हे लिहू वाटत आहे.
लग्नाच्या अगोदर तिचा एक मित्र होता.चांगला मित्र होता.लग्नानंतर ती जेव्हा संसारात रुळते तेव्हा त्याला अनुभूती होते की तिच्यावर त्याचे प्रेम आहे.
तिचा प्रेमप्रस्ताव तो तिला कळवतो आणि ती भाबडी मुलगी सुद्धा त्याच्या या प्रस्तावाने बधिर होऊन जाते…!
ते हल्ली झुरतात म्हणे एकमेकांसाठी….तिने तिच्या मनातील हे द्वंद्व मला कथन केले….क्षणभर मी सुद्धा बधिर झालो व विचारांच्या प्रवाहात वाहू लागलो….
कुठे निघालोय आपण.जगात ज्या भारतीय विवाह संस्कृतीचा आदर्श दिला जातो ती संस्कृती टिकवण्याचे काम हे प्रत्येक विवाह झालेल्या पती व पत्नीचे असते.
भोगप्रवृत्ती हल्ली समाजात फारच बळावत निघालेली आहे.
मला माहिती नाही त्या मुलाचे लग्न झाले आहे किंवा नाही पण त्याच्या पत्नीला जर कोणी असा प्रस्ताव ठेवला असता तर ?
पत्नी राहूदे बहीण,भाची,पुतणी.. कोणत्याही नात्यातील विवाहित स्त्री ला जर कोणी पुरुष असा प्रस्ताव ठेवत असेल तर तो त्याला चालेल का ?
याचे उत्तर जर होय असेल तर त्याला या गोष्टीची माफी मी स्वतः नक्की देईन…..
प्रेम या नावाखाली स्वतःची पत्नी कोणी दुसऱ्याशी वाटू शकतं नाही हे जर खरे असेल तर स्वतः तसे का वागावे ?
माणसाचे मन मोठे विलक्षण आहे..जोवर दुसऱ्याच्या बाबतीत घडते तोवर आपल्याला काही वाटत नाही,आपल्यासोबत घडले तर मात्र डोक्याचा तीळपापड…
माणूस हा स्वतःसाठी वकील आणि दुसऱ्यासाठी न्यायाधीश असतो..स्वतःच्या हजर चुका मान्य दुसऱ्यांनी केली तर त्वरित टोकाचा निर्णय….
प्रत्येक विवाहित स्त्री च्या आयुष्यात लग्नानंतर पहिले व शेवटचे प्रेम जर पती आणि पतीच्या आयुष्यात तिची पत्नी असेल तर जीवनासारखी सर्वात सुखाची गोष्ट दुसरी कोणती असेल…?
प्रेमच करायचे असेल तर ते त्यागात आहे…भोगून व्यक्त करतात ते प्रेम नव्हे तर प्रेम या पवित्र नावाला दिलेली सर्वात घाण शिवी असेल असे माझे मत आहे….
मी त्या व्यक्तीला या लेखाद्वारे विनंती करेन…तुझे जर तू म्हणत असशील तसे त्या व्यक्तीवर खरे प्रेम असेल तर तिला तिच्या पतीसोबत सुखाने राहू दे…
त्यागातला आनंद मिळव..बघ जमते का…हा निसर्ग तुला तितकेच निस्वार्थी व पवित्र प्रेम परतफेड म्हणून देईल….
त्या स्त्री ला विनंती…. तुझ्यासाठी व तुझ्या कुटुंबासाठी दिवसभर जो राबतो त्याच्या नजरेत तुला खरे प्रेम दिसत नाही ?
जे मंगळसूत्र तू अभिमानाने घालतेस तो केवळ दागिना नाही तर तू तुझ्या पतीला दिलेले ते वचन आहे…
जे लिहल आहे ते समजते का बघा…जे लिहले नाही ते सुद्धा समजवून घेण्याचा प्रयत्न करा…
तरीही नाही जमले तर या नात्याला किमान “प्रेम” या उदात्त आणि पवित्र नाव मात्र देऊन त्याची अवहेलना मात्र करू नका.