महाराष्ट्रा सह संपूर्ण देशाला सुन्न करणारी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) अचानक आग लागली आणि ह्या घटने मध्ये दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास ही आग लागली , आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा अंदाज लावला जात आहे.
धुरामुळं गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.
या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.
आता , ह्या आगीमध्ये जीव गमावलेल्या बालकांच्या पालकांचा खूप आक्रोश रुग्णालय परिसरामध्ये पाहायला मिळत आहे.

अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे.
आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात त्यांच्या मातांचा आक्रोश पाहायला मिळात आहे .
एकीकडे आपल्या नवजात बालकांचा मृत्यू आणि दुसरीकडे रुग्णालयाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती पुरविली जात नाहीय , अद्यापही पूर्ण माहिती दिली जात नाहीयं,
एवढंच काय तर बालकांना भेटूही दिलं जात नाहीयं, त्यामुळं पालकांमध्ये आणि मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
काही पालकांना त्यांचं बाळ हयात आहे, की नाही याबाबतही काहीही सांगितलं जात नाही.
रुग्णालयाकडून बालकांच्या पालकांची हेळसांड केली जात आहे त्यामुळे , मनात वेगळाच काहूरही माजला आहे.
सदर घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घालेली असल्याचे म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

ह्या जीव हेलावणाऱ्या घटनेची माहिती मिळताच बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
पण, इथं परिस्थिती मात्र संपूर्ण हाताबाहेर गेली असून त्यांना कोणाकडूनही कसलीच मदत मिळत नसल्यामुळं आधीच दु:खाचा डोंगर कोसळला असूनही ,
त्यांना कोणतीच अधिकृत माहिती दिली गेलेली नाहीय त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवजात बालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातांची आणि नातेवाईकांची झालेली अवस्था बघताना मन सुन्न होत आहे.
दरम्यान, अनेक नेतेमंडळी आणि स्थानिक नेतेमंडळींनी या घटनास्थळाचा आढावा घेतला.
स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत या बेजबाबदारपणासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.
परंतु त्या मातांचा काय ज्यांनी ह्या घटने मध्ये आपल्या बाळाचा जीव गमावला ?
रुग्णालयाकाढून एवढा बेजबाबदारपणा घडतोचं कसा ? कोण आहे ह्याच्या मागे ? असे एक न अनेक सवाल मनात निर्माण होत आहेत.