महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये अचानकच वाढ झालेली आढळून आली आहे.
रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी ३ हजार ३६५ नवे रुग्ण पॉसिटीव्ह आढळून आलेले आहेत.

पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास २१ हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप व्हायला सुरुवात झाली आहे, याचा अंदाज येतो.
याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे.
जर कोरोनाचा असाच प्रकोप कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का?
पूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे.

परंतु काही भागात किंवा शहराच्या काही भागात लॉकडाऊन केला जाऊ शकतो.
ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाला तर ज्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं. जसं की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई.
असंही होऊ शकतं की संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तिथेच लॉकडाऊन केलं जाऊ शकतं.
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्या कारणाने जसंजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसंतसं निर्बंध हटवले गेले.

परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे.
अर्थव्यवस्थेची गाडी आता कुठे रुळावर यायला सुरुवात झाली आहे.
अशात लॉकडाऊन न करता जनतेवर काही निर्बंध लादले जाऊ शकतात.